मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार जेलमध्येही झाला होता. कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जेलमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात लसीकरण केंद्र (vaccination Program) सुरु करण्यात आले असून आज (मंगळवार) कारागृहातील ओळखपत्र नसलेल्या १६९ कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
'या' लोकांकडे नसते ओळखपत्र
ओळखपत्र नसलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. लस घेण्यासाठी नागरिकांना सरकारने विहित केलेले ओळखपत्र सादर करावे लागते. मात्र, ज्या व्यक्तिकडे कोणत्याही प्रकारचे विहित ओळखपत्र नाही, असे काही नागरिकही आढळत आहेत. उदाहरणार्थ बेघर व्यक्ती, साधू-संत, कारागृहातील बंदीवान, सुधारगृहात राहणाऱ्या व्यक्ती, मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये राहणारे नागरिक, वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ नागरिक, रस्त्याच्या कडेला राहणारे नागरिक यांच्याकडे ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले. अशा नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
ओळखपत्र नसलेल्या कैद्यांचे लसीकरण
ऑर्थर रोड कारागृहातील सुमारे २४२ कैद्यांचे लसीकरण यापूर्वी टप्प्या-टप्प्याने कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आले होते. त्यांच्याकडे ओळखपत्र होते. मात्र, ओळखपत्र नसलेल्या कैद्याची होणारी अडचण लक्षात घेऊन आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने मध्यवर्ती कारागृहातच स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ओळखपत्र नसलेल्या १६९ कैद्यांना आज (मंगळवारी) लस देण्यात आली. त्यासाठी मुंबई प्रोजेक्ट बिगर शासकीय संस्थेचे सहकार्य लाभले. त्यामुळे संसर्ग फैलावास अटकाव करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा-'कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू'