मुंबई - कांदिवली पूर्व भागातील जानू पाडा कंपाऊंडमध्ये राहाणाऱ्या एका सर्वसाधारण कुटुंबातील १६ वर्षीय मुलीने मोबाईलवर गेम खेळायला मिळाला नाही म्हणून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीचे मोबाईलवर गेम खेळण्यावरुन लहान भावाशी भांडण झाले होते. लहान भाऊ गेम खेळण्यासाठी मोबाईल देत नाही म्हणून मुलीने लहान भावासमोरच विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण? -
समता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जानू पाडा कंपाऊंड येथील बहिण-भावामध्ये शुक्रवारी रात्री मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला. वडील रिक्षा चालक आणि त्यांना चार मुली आणि एक मुलगा अशा या सर्वसाधारण कुटुंबात एकच मोबाईल आहे. लहान भाऊ मोबाईलवर गेम खेळू देत नाही म्हणून युवतीचे शुक्रवारी रात्री भावासोबत भांडण झाले. त्याच रात्री युवतीने ११.३० वाजता जवळच असलेल्या मेडिकल शॉपमधून विषारी औषध खरेदी करुन आणले आणि लहान भावासमोरच विषारी औषध प्राशन केले. लहान भावाने या घटनेची माहिती तत्काळ कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. समता नगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पीएसआय संतोष खर्डे यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केल्यानंतर कुटुंबीयांची चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मुलीने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी १० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
हेही वाचा - snake bite : सर्प दंश झालेल्या पूर्वाची प्रकृती सध्या धोक्याबाहेर, पण देखरेखीची गरज