मुंबई - कोरोना व्हायरसचे संक्रमन थांबविण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 107 पोलिसांना कोरोनाची लागन झाली आहे. यामध्ये 20 पोलीस अधिकारी तर 87 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात 7 पोलीस कर्मचारी बरे झाले असून, मुंबई पोलीस खात्यातली 2 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 98 जणांवर उपचार सुरू आहेत.
राज्याभरात 22 मार्च ते 27 एप्रिल या काळात 73 हजार 735 गुन्हे दाखल झाले आहेत. क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या 610 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 150 घटना घडल्या असून, या प्रकरणी 482 जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात लॉक डाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण नंबरवर आतापर्यंत 79 हजार 051 फोन आले आहेत. अवैद्य वाहतूक संदर्भात 1100 गुन्हे दाखल करण्यात आले असून 15 हजार 845 जणांना अटक करून तब्बल 48 हजार 177 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
राज्यात सर्वाधिक गुन्हे पुणे शहरात नोंदवले गेले असून, 12 हजार 367 एवढे प्रमाण आहे. पिंपरी चिंचवड येथे 6 हजार 115, नागपूर शहर 3 हजार 886, नाशिक शहर 3 हजार 740 असे गुन्हे नोंदवले आहेत. सर्वात कमी गुन्हे हे अकोला येथे 64 आहेत.