मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. 3 हजारांच्या वर लोकांना महाराष्ट्रात आत्तापर्यंत लागण झाली आहे. यामध्ये मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. गोवंडीतील शिवाजी नगरमध्ये कोरोना संसर्ग रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. दाटीवाटीच्या असलेल्या या भागात आतापर्यंत १०३हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
बुधवारी येथे ९५ रुग्ण होते. गुरुवारी ही संख्या १०३ वर पोहोचली. वाढती आकडेवारी नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या काही ठिकाणी घटत असल्याचे चित्र असले तरी काही भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबधितांची ठिकाणे असलेल्यांमध्ये शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्दचा सहावा क्रमांक लागतो. या विभागात बुधवारी ९५ रुग्ण होते, गुरुवारी ही संख्या १०३वर गेली. तर ३०० लोक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आणि विभाग हॉटस्पॉटवर असताना येथे लोकांमध्ये सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे.
शिवाजी नगरात रफिक नगर, बैंगणवाडी ते लल्लुभाई मानखुर्द पर्यंतचा हा परिसर दाटीवाटीने वसलेला आहे. रफिकनगर हा छोट्या- छोट्या झोपड्यांचा भाग डंपिंग ग्राऊंडच्या जवळपास आहे. आधीच या भागात क्षय, न्यूमोनियाचे प्रमाण मोठे असताना या परिसराला कोरोनाने विळखा घातल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना संसर्ग अधिक पसरू नये यासाठी पालिकेने येथे यंत्रणा उभारली आहे. हेल्थकॅम्प आयोजीत करून लोकांची तपासणी केली जात आहे. जो भाग कोरोनाबाधित आहे. तेथे पालिकेच्या यंत्रणेने अधिक खबरदारी घेतली आहे. रुग्णांची वाढती संख्या कमी करण्याच्या दृष्टीने पालिकेचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.