मुंबई: बेटिंगसाठी मोबाइल एप्लिकेशन पुरवणाऱ्या सट्टेबाज सुशील अशोक अग्रवाल ऊर्फ सुशील भाईंदरला गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. बुकी अलीकडच्या काळात पोलिसांना चकवा देण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. मोबाइल ॲप्लिकेशनसह बुकींना संपर्क साधण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणि व्यवहारांसाठी बिटकॉइनसारख्या बेकायदेशीर चलनाचाही वापर होऊ लागला असल्याची माहिती मिळत आहे.
कराची कनेक्शन: सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचसाठी मोठ्या प्रमाणावर लाखोंचे सट्टे लावले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सट्ट्यातून मिळालेले पैसे हवालामार्फत नातेवाईकांकडून किंवा एजंट मार्फत कराचीला पाठवले जातात. त्याचप्रमाणे 'डी' गॅंगच्या सांगण्यावरून मुंबईत मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात असल्याची माहिती देखील सूत्राने दिली; मात्र अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात असल्यामुळे पोलिसांना या सट्टेबाजांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.
सट्टेबाजही झाले स्मार्ट: एखाद्या मॅचवर सट्टा खुला करण्याआधी सट्टेबाज आणि त्यांचे साथीदार टोपण नावे जाहीर करतात. पैशाचे व्यवहार किंवा लॅपटॉपमध्ये टोपण नावांनी नोंद केली जाते. पोलिसांनी अटक केलेला विंदू दारासिंग हा जॅक या टोपण नावाने सट्टा खेळत होता असा आरोप आहे. सट्टेबाजांकडून आता मोबाईल किंवा वेब ॲप्लिकेशनचा वापर केला जात आहे. ईमेलप्रमाणे सट्टेबाज आणि त्यांच्या साथीदारांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. आता नोंदवही ऐवजी लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर होतो. हवालाची जागा बिटकॉइनने घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे परदेशात बसूनही मुंबईतील व्यक्तीकडून सट्टा लावता येत असल्यामुळे सट्टेबाजांना पकडणे पोलिसांना अवघड झाले आहे.
संपर्कासाठी Appचा वापर: अलीकडेच अटक झालेल्या आरोपींकडून सट्ट्यांचे ऑनलाइन रेकॉर्ड ठेवले जातात. आपसात संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या एप्लिकेशन, व्हीओआयपी (VOIP) आदी यंत्रणांचा वापर केला जातो. बुकी चालत्या वाहनात किंवा सातासमुद्र पार बसूनही सट्टा लावत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवणे पोलिसांना जिकरीचे बनले आहे.
इतर खेळांवरही सट्टेबाजी: फक्त क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक खेळात सट्टेबाजी चालते. बहुतांश देशात सट्टेबाजी अवैध असल्यामुळे त्यामध्ये संघटित गुंडांच्या गँग सक्रियपणे गुंतलेल्या असतात. भारतात दाऊद टोळी म्हणजेच 'डी' गॅंग फार पूर्वीपासून सट्टेबाजीत सक्रिय आहे. फॅन्सी सट्ट्यात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या किती धावा होतील, किती बॅट्समन बाद होतील, एका षटकात (ओव्हर) किती धावा काढल्या जातील, यावरही सट्टा लावला जातो. फॅन्सी सट्ट्यामुळे स्पॉट फिक्सिंगचे प्रमाण वाढू लागले.