मुंबई - शहरातील चारकोप परिसरात एक वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला 15 हजारांत विकणाऱ्या दोन आरोपींना चारकोप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केवळ 2 तासांमध्ये पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका केली. 1 वर्षाच्या बाळाचा अपहरणाचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
यामुळे दिली अपहरणाची सुपारी..
मुंबई ते अंधेरी परिसरात राहणाऱ्या सचिन येलवे ( वय 40) व सुप्रिया येलवे ( वय 36) या दोघांच्या लग्नाला 20 वर्ष झाली होती. मात्र 20 वर्ष होऊन सुद्धा मूल होत नसल्यामुळे त्यांनी मूल दत्तक घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मात्र त्यास यश मिळत नसल्यामुळे त्यांनी एका दाम्पत्याला मूल चोरी करून आणून देण्यासाठी पंधरा हजार देऊ केले होते.
असे केले अपहरण...
येलवे दाम्पत्याला मुलाची गज होती. म्हणून त्यांनी रश्मी पवार व राजू पवार यांच्याशी संपर्क साधला होता. 15 हजारांत लहान बाळ आणून देतो, असं सांगून त्यांनी यासाठी परिसरामध्ये रेकी करण्यास सुरुवात केली होती. 2 ऑक्टोबर रोजी चारकोप पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या अंबुजवाडी येथील फुटपाथवर सुनीता गुरव नावाची महिला तिच्या लहान मूल व नवऱ्यासोबत झोपली होती. पहाटेच्या वेळेस रश्मी पवारने सुनीता गुरवच्या बाजूला झोपलेल्या एक वर्षाच्या मुलाला उचलून पोबारा केला.