लातूर - ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला जातो, तो नावालाच. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांनाच हाताशी धरून अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार तर देशोधडीला लागतच आहे. शिवाय तरुण पिढीही उद्ध्वस्त होत आहे. गावात पाणी कमी अन् दारूच जास्त झाली असल्याचा आरोप करत औसा तालुक्यातील हरेगावच्या महिलांनी किल्लारी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
गावच्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव घेण्यात आला होता. मात्र, यास पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने पुन्हा अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींची संख्या तर वाढत आहेच, शिवाय महिलांना गावात राहणेदेखील कठीण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीने हाताला काम नाही आणि गावात दारूचा पूर येतोय. त्यामुळे संसाराचा गाडा हकावा तरी कसा, असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला आहे.
हरेगाव हे औसा-गुबाळ मार्गावर असून या मद्यपींचा नाहक त्रास प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. अवैध दारूचे बॉक्स गावात येताच महिलांनी त्याची होळी केली होती. परंतू विक्रेत्यांकडून त्यांना धमकी देण्यात आल्याने बुधवारी प. स. सदस्या शिवगंगा मुडबे व सरपंच सरस्वती पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी किल्लारी पोलीस ठाण्यासमोर गावच्या महिला समस्यांचा पाढा बोलून दाखवत होत्या तर सपोनी मेत्रेवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलांची समजूत काढत होते. केवळ आश्वसनांची बोळवण न करता प्रत्यक्ष कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी कारवाईचे आश्वसन दिले.