लातूर- थेंब- थेंब पाण्याचे महत्व सध्या लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला कळू लागले आहे. जलस्रोतांनी तर तळ गाठला आहे. परंतु प्रशासनालाही पाझर फुटत नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. लातूर तालुक्यातील ममदापूर ग्रामस्थांना पाण्याच्या एका घागरीसाठी अडीच रुपये मोजावे लागत आहेत. तर सांडपाण्यासाठी दिवसभर हपशावर ठाण मांडून बसावे लागत आहे. भर उन्हात घामाच्या धारा आणि त्याच धारेच्या एवढी पाण्याची धार यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
लोकसभेची रणधुमाळी संपली असली तरी प्रशासन अद्यापही सुस्तच आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली असून उपाययोजनेकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. टंचाईचा आढावा घेऊन संबंध जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला. त्यानुसार उपाययोजनेबाबत बैठकाही पार पडल्या मात्र, उपाययोजनेबाबतची उदासीनता नागिरीकांच्या जीवावर बेतत आहे. म्हणूनच औसा तालुक्यातील आलमला येथे पाणीटंचाईचे तीन बळी गेले.
तालुक्यातील ममदापुर येथेही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावच्या विहिरी, बोर आठल्याने येथील ग्रामस्थांना अडीच रुपयाला एक घागर विकत घ्यावी लागत आहे. तर सांडपाण्यासाठी गावात असलेल्या बोरवर रात्र-दिवस काढावा लागत आहे. भर उन्हात जेवढा आमचा घाम निघतो त्यापेक्षा कमी पाणी मिळत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ८ दिवसाला ५०० लिटर पाणी दिले जात असले तरी संबंध कुटुंबियांचे भागवायचे कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.
ममदापूर गावच्या मध्यवर्ती भागात एकच हपसा असून त्यावरच गावची मदार आहे. गेल्या आठवड्यापासून टंचाई संदर्भात जिल्हा प्रशासनाने तालुक्यानिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत उपाययोजना नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना आहेत. ग्रामीण भागातील चित्र पाहून जिल्ह्यात टंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने कबुल केले असून आता प्रत्यक्षात उपपययोजनांची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.