लातूर - सध्याच्या पाणीटंचाईच्या झळा लातूरकरांना मोठ्या प्रमाणात सहन कराव्या लागत आहेत. येथील बाप्पा उत्सव मंडळाच्या वतीने यंदा जलसंवर्धनाबाबतीची जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे. दरवर्षी विविध प्रकारच्या देखाव्याबरोबर यंदा हा उपक्रमही लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा आशावाद गणेश भक्तांनी व्यक्त केला आहे.
लातूर शहराला सध्या महिन्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात लातूरकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. असे असतानाही अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जात आहे. त्यामुळे यंदा हा अभिनव उपक्रम मंडळाने हाती घेतला आहे. या मंडळाच्या गणेश मूर्ती ही फायबरची आहे आणि गणेशोत्सवात जी मूर्ती बसविण्यात येते ती ईको फ्रेंडली असते. गणपतीला दुर्वा अर्पण करण्याचा मोठा मान आहे. या मंडळाच्या गणपतीला अर्पण होणारा सर्व दुर्वा जमा करून त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. मंडळातील भक्त जलसंवर्धनाचा संदेश देत असले तरी यंदाच्या वर्षी जलसंवर्धनाबरोबरच वृक्षलागवड आणि रेन वॉटर हार्वेस्टींगबाबातची जनजागृती संपूर्ण प्रभागात करण्याचा निर्धार या मंडळातील महेश कोल्हारे, राजेंद्र इटकर, महेंद्र इटकर यांनी बोलून दाखवला.
यंदा दुष्काळाचे सावट असतानाही गणेशोत्सवात मोठा उत्साह दिसून आला. त्याच बरोबर सामाजिक उपक्रम राबिवण्याचा लातूर पॅटर्न यंदाही सुरूच राहणार असल्याचे चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे.