लातूर- वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ संबंध जिल्हाभर आंदोलने सुरु आहेत. ४ दिवसांपूर्वी लातूर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. गुरुवारी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी अत्याधुनिक विद्युत मीटरच्या नावाखाली मीटर बदलण्यात आले होते. मात्र, वाढीव बिल कायम येत असल्याने वीज ग्राहक त्रस्त आहेत. महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करूनही समस्या कायम राहिल्याने गुरुवारी निलंगा येथे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. वीजबिल जर कमी झाले नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातंब्रे यांनी दिला.