लातूर - शहरासह जिल्ह्यात अत्याधुनिक पद्धतीचे विद्युत मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, या बदसलेल्या ५० हजार मीटरमुळे ग्राहकांना दुपटीनेच विज बिल येत आहे. यामुळे लातूरकर त्रस्त आहेत. युनिटसंदर्भात चुकीची नियमावली लादली जात असल्याच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अधिक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहे. युनिटमध्ये नियमितता आणण्याच्या उद्देशाने मिटर बदलण्यात आले. मात्र, यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. मीटर बदली केल्यापासून विजबिलात दुपटीने वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले असून भर दुष्काळात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांना कोणतिही पुर्वसुचना न देता खासगी कंपनीचे मीटर बसवण्यात आले होते. त्यामुळेच वाढीव बिल येत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. नागरिकांच्या याच समस्या घेऊन आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून नागरिक दाखल झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अॅड. गोपाळ बुरबुरे, डॉ. अरविंद भातंबरे, अॅड. जयराज जाधव, अमोल लांडगे, मार्शल माने यांची उपस्थिती होती. विविध मागण्यांचे निवेदन अधिक्षक अभियंता नंदेश माने यांना देण्यात आले.