लातूर : उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही ७ वर पोहचली आहे. त्यामुळे शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या असून कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. एवढेच नाही तर नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील घरपोच केला जात आहे. बुधवारी एकाच दिवशी नव्याने ४ रुग्ण आढळून आल्याने ही खबरदारी घेतली जात आहे.
हेही वाचा... Happy Birthday Rohit Sharma : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे टीम इंडियाचा 'हिटमॅन'
उदगीर शहरात ७ कोरोनाबधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय ३० नागरिकांचे स्वॅबचे नमुने (घशातील स्त्रावाचे नमुने) तपासणीसाठी लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. उदगीर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. गुरुवारी सकाळी शहर पोलिसांनी रूट मार्च काढून नागिरकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. याशिवाय नगरपरिषदेच्यावतीने दोन रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेसाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत.
लातूर जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय स्तरावर सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. असे असले तरिही कोरोनाचा संसर्ग शहरात कसा सुरू झाला, याचा उलगडा अद्याप झाला नाही. सातही रुग्णांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ३० व्यक्तींच्या कोरोना चाचणीचे अहवाल गुरुवार संध्याकाळपर्यंत उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले आहे.