लातूर - तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रात दरोडा, खंडणी, चोऱ्या, वाटमारी, खून यासारखे गुन्हे करणाऱ्या इराणी टोळीचे दरोडेखोर हे पोलीस असल्याचे सांगत वयोवृद्धाला लुटू लागले होते. मात्र, यातील एका अट्टल दरोडेखोराला वृद्धाने व त्याच्या मुलाने पकडून कासार शिरसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
माधव वाघोबा म्हेत्रे यांच्या तक्रारीवरून कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कल्याण येथून ५० हजार रुपये घेऊन माधव वाघोबा म्हेत्रे (रा.ममदापूर ता.निलंगा) हे आपल्या शेतात दुपारी २ वाजता बसले होते. अचानक आरोपी मुजलूम रियासत अली नवाब व त्याचा एक फरार साथीदार (रा.छिद्री बिदर) हा मोटरसायकलवर आला व म्हेत्रे यांना मी पोलीस आहे, असे म्हणत त्यांना मारहाण केली. शिवाय खिशात हात घालत पाच हजार रुपये घेऊन पळ काढायला लागला होता. मात्र, म्हेत्रे यांनी आरडाओरडा चालू केला. बाजूलाच काम करत असलेला त्यांचा मुलगा आला, त्याने आरोपीचा पाठलाग केला. यातच दरोडेखोरांची दुचाकी घसरली व तो खाली पडला, यामुळे तो सापडला. सर्व शिवारातील लोक एकत्र जमून इराणी गँगच्या या चोराला पकडून बैल गाडीला बांधून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक काकडे व त्यांचे सहकारी भोंगे तपास करत आहेत.
इराणी टोळीची आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या चार राज्यात दहशत आहे तरुण मुले या गँगमध्ये सामील होऊन असे गंभीर गुन्हे करत आहेत.