लातूर - दोन जातीत अथवा दोन समाजात वाद निर्माण होईल, अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात टाकू नये ,असे वारंवार पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येते. अशाच प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल दोघांविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंगा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार प्रणव काळे यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयूर आंतरेड्डी (रा. पेठ निलंगा) व हंसराज शिंदे (रा.पांचाळ कॉलनी निलंगा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर दोन समाजात वाद निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल दोघांच्या विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात कलम ५०५ (२), भादवी सहकलम ५२ राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डि पी बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशियल मीडियावर टाकू नयेत, पोष्ट टाकणाऱ्यावर व ग्रुप अॅडमीनवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी दिला आहे.