लातूर - निटूर ग्रामपंचायतीचा गलथान कारभार दोन चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे. ऐन रक्षाबंधनच्या दिवशीच ग्रामपंचायतीलगत असलेल्या नाल्यात पडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले असून गावकऱ्यांनी या दोघांचे मृतदेह ग्रामपंचायतीमध्ये ठेवले आहेत.
निलंगा तालुक्यातील निटूर येथे जोया मेहबूब फकीर (वय,6 वर्ष) व तिचा लहान भाऊ आदिल हे दोघे खेळत होते. बऱ्याच वेळानंतरही मुले घराकडे परत न आल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या लगत असलेल्या नाल्याजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. यामुळे मुले नालीत पडली असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली असता, जोया आणि आदिल यांचे मृतदेह नालीत आढळून आले.
ग्रामपंचायतीने खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याने, संतप्त ग्रामस्थांनी या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात ठेवले आहेत. जोपर्यंत या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा या चिमुकल्यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. दरम्यान, शिरुर अनंतपाळ ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.