लातूर - जिल्ह्यातील औसा येथे एकाच दिवशी कोरोनाचे आठ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी व्हावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील दोन कुटुंबातील एकूण आठ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी आल्याने संपूर्ण शहर हादरुन गेले आहे. शहरातील काही भाग सील केला असून या परिवारातील व्यक्तींचा संपर्क आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध चालू असून ही यादी मोठी आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्यांची संख्या वाढत जात असल्याने शहरातील धोका वाढला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून औसा शहर लॉकडाऊन करण्याबाबत व्यापारी, नगर पालिकेचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. आमदार अभिमन्यू पवार अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती. शहरात ३ दिवसांसाठी संचारबंदी लागू करणे व शहरातील दुकाने दिवसाआड उघडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळासह भेटून निवेदन देण्यात आले. पण, प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊन करता येत नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले होते. यानंतर औसा येथील व्यापारी संघटना मंगळवारपासून दोन दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळत आहेत. त्यामुळे शहरात आज शुकशुकाट पाहावयास मिळाला.