लातूर- लातूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात कोरोना रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यामध्ये तब्बल 804 रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण
सोमवारी लातूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सोमवारी 804 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 36 हजार 332 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 29 हजार 573 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील 12 नंबर पाटी, तंत्र निकेतन महाविद्यालय इमारत तसेच उदगीर ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथे कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र आता रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आणखी आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकिय अधिकारी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणात दोन हजार कोटींपेक्षा अधिक वसुली - किरीट सोमैया