लातूर- १५ ऑगस्टनंतर शहरातील लॉकडाऊन हटविण्यात आले होते. तत्पूर्वी व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिक अशा १० हजार जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यानंतरही शहरातील ५ केंद्रावर अँटिजन टेस्ट सुरू आहेत. दरम्यान, अँटिजन किटचा तुटवडा असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला होता. मात्र, अँटिजन किटचा तुटवडा नसल्याचे मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात दिवसाकाठी २०० ते २५० कोरोना रुग्णांची भर पडत आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरासह ग्रामीण भागात अँटिजन टेस्ट करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला होता. शहरात ७ ठिकाणी ही टेस्ट केली जात होती, तर आतापर्यंत १० हजार जणांची टेस्ट करण्यात आली आहे. अँटिजन टेस्टच्या किटचा तुटवडा असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला होता. परंतु, कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. सध्या महानगरपालिकेकडे ४ हजार ८०० किट्स आहेत. मध्यंतरी कमी प्रमाणात होते, त्यामुळे आणीबाणीच्या स्थितीत उपयोगी येणाऱ्या किटचा वापर करण्यात आला. असे असले तरी किटचा तुटवडा आहे, असे म्हणता येणार नाही.
बुधवारी ९४२ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली होती. पैकी २३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मध्यंतरी भाजपच्या नगरसेवकांनी उभारण्यात आलेल्या केंद्रावर पाहणी करून किटचा तुटवडा असल्याचे सांगितले होते. मात्र, हा प्रक्रियेचा भाग आहे. लॉकडाऊन हटविल्यानंतर मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या होत्या. त्यामुळे, किटची संख्या कमी झाली असली, तरी तुटवडा भासला असे म्हणता येणार नाही. सध्या मनपाकडे ४ हजार ८०० किट्स असून त्याची आवक सुरू असल्याचे मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- निलंगा तहसील कार्यालयासमोर मनसेचे धरणे आंदोलन, पीक नुकसान भरपाईसाठी केली घोषणाबाजी