औसा (लातूर) - महिनाभरापासूम बेपत्ता असलेल्या औसा तालूक्यातील लामजना नजीकच्या गोटेवाडी येथील दोन वृद्ध मावस बहिणींची जावयाने हत्या करुन मृत शरीराचे तुकडे करुन शेततळ्यात पुरले व त्यावरच एक गाय मारुन पुरल्याची 'डबल मर्डर मिस्ट्री' उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, औसा तालूक्यातील लामजना नजीकच्या गोटेवाडी शिवारात शेवंताबाई ज्योतिबा सावळकर (वय 82) व त्रिवेणीबाई सगन सोनवणे (वय 85) या दोघी मावस बहिणी राहत होत्या. शेवंताबाई यांना एकच मुलगी आहे. तिचा विवाह लामजना येथील राजू उर्फ त्र्यंबक गुरसिद्ध नारायणकर याच्याशी झाला आहे. तो मुंबई येथे ड्रायव्हर आहे. शेवंताबाईला मुलगा नसल्याने त्यांनी आपली जमीन जावयाऐवजी मुलीच्या नावे केली आहे. गोटेवाडी शिवारात राहणाऱ्या या वयोवृद्ध दोघी बहिणी 7 जुलै 2021 रोजी गायब झाल्या. आई व मावशी अचानक गायब झाल्याने त्रिवेणीबाई सोनवणे यांचा मुलगा ॲड. नवनाथ सोनवणे यांनी किल्लारी पोलिसांत 11 जूलै 2021 रोजी तक्रार दिली. तेव्हापासून किल्लारी पोलीस विविध पातळीवर शोध घेत होते. शिवाय त्या दोघींच्या शेतातील घरातील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याने घातपाताचा संशयही होता.
तब्बल एक महिना लोटला तरी पोलिसांना या दोन आजींचा शोध लागत नव्हता. शेवंताबाईचा जावई राजू नारायणकर या ड्रायव्हरवर संशय होता. त्यासाठी किल्लारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे, बीट जमादार सचिन उस्तुर्गे, पोकॉ आबा इंगळे यांनी आरोपीच्या शोधात मुंबई, पुणे येथे जावून अनेक वेळा शोध घेतला. शेवटी आरोपीला अटक करण्यात किल्लारी पोलीसांना यश आले. मुंबईच्या मानखुर्द येथून आरोपीला अटक करुन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आहे.
सासूने आपली जमीन मुलीच्या नावे केल्याचा राग मनात धरून जावयाने सख्या सासुसह मावस सासूची दुहेरी हत्या केली आहे. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि शेततळ्यात पुरले. शिवाय कोणाला शंका येऊ नये म्हणून एका गाईची हत्या केली आणि तिलाही या मृतदेहाच्या गाठोड्यावर पुरले असल्याची थरकाप उडवणारी घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी राजू उर्फ त्र्यंबक गुरसिद्ध नारायणकर याच्यासह दोघांना किल्लारी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. आरोपीला घटनास्थळी आणून जेसीबीने मृतदेह बाहेर काढले. डॉ. अभिषेक सानप यांनी कुजलेल्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केले. जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली असून आरोपी विरोधात भादंवि 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.