लातूर - प्लाझ्मा उपचार पद्धतीने कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरीही लातूरमध्ये कोरानाशी यशस्वी लढा दिलेल्या आठही परप्रांतीय नागरिकांनी प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शवली आहे. स्वतः कोरोनाची लढाई जिंकलेले हे नागरिक आता इतरांच्या मदतीला येत असल्याने त्याचे स्वागत करण्यात येत आहे.
हेही वाचा... भाजप नगरसेवकाच्या घरात रंगला पत्त्यांचा डाव; १२ जण ताब्यात
काही दिवसांपूर्वी 12 परप्रांतीय नागरिक हे निलंगामार्गे आंध्र प्रदेशकडे निघाले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना निलंगा येथील एका धार्मिकस्थळी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी झाली असता त्यातील 8 जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. 14 दिवस उपचारानंतर हे सर्वजण कोरोनामुक्त झाले असून त्यांना निलंगा येथेच पुन्हा क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या या नागरिकांनी आता इतर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शवली आहे. प्लाझ्मा उपचार पद्धतीने कोरोनावर मात करता येते, याची त्यांना माहिती मिळताच त्यांनी ही तयारी दर्शवली आहे. कारण कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांचेच प्लाझ्मा या उपचारासाठी आवश्यक असतात. या पद्धतीला अजून परवानगी मिळाली नसली तरिही गरज भासल्यास आम्ही प्लाझ्मा दान करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कौतुक केले आहे.