लातूर - अनलॉकमध्ये सर्वकाही पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, शाळा महाविद्यालये सध्या बंद असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने लातुरात संगमेश्वर ट्रस्टच्या वतीने खास विद्यार्थ्यांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. इयत्ता 1ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवर येथे उपचार केले जाणार आहेत.
शैक्षणिकदृष्ट्या लातूर शहर महत्वाचे आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून येथील विद्यार्थ्यांची रेलचेल बंद आहे. शाळा, महाविद्यालय याचबरोबर येथील खासगी कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामुळे अर्थकारण ठप्प आहे. पण, या शैक्षणिक क्षेत्राला अधिक गतिमान करण्यासाठी संगमेश्वर ट्रेसचे उमाकांत होणराव यांनी शहरातील रेणापूर नाका येथे विद्यार्थ्यांसाठी हे कोविड सेंटर उभारले आहे. या ठिकाणी शहरातील कोणत्याही शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर उपचार केले जाणार आहेत. स्वास्थ कोविड सेंटरमध्ये 65 खाटांची सोय करण्यात आली आहे. तसेच 12 ऑक्सिजन खाटा, 12 परिचारिका व उपचारासाठी डॉक्टरही असणार आहेत. शिवाय औषधोपचार, जेवण व इतर व्यवस्था ही मोफत राहणार आहे.
नॉन-मेडको स्वयंसेवी संस्थेने सुरू केलेले हे पहिलेच कोविड सेंटर आहे. येणाऱ्या काळात शाळा, महाविद्यालय सुरू झाली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा महत्वपूर्ण राहणार असल्याचे त्रिपुरा महाविद्यालयाच्या कोषाध्यक्ष प्रेरणा होणराव यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा आगळा-वेगळा उपक्रम लातूर पॅटर्नला दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - पती कॅन्सरने पीडित असताना लातूरच्या रणरागिणीची 6 महिने सुट्टी न घेता रुग्णांची अविरत सेवा