लातूर- दिवंगत विलासराव देशमुख यांच्या काळात मंजुरी मिळालेल्या लातूरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे या हॉस्पिटलचे उद्घाटन रखडले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणतीही औपचारिकता न बाळगता या हॉस्पिटलमध्ये 200 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी पाहणी केली असून हे हॉस्पिटल आता कोविड रुग्णांसाठी सज्ज झाले आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण होऊनही सेवा का पुरवली जात नाही, असा विचारला जात होता. या हॉस्पिटलला दिवगंत विलासराव देशमुख असताना मंजुरी मिळाली होती. इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी माजी खासदार सुनील गायकवाड, आमदार संभाजी पाटील यांनीही पाठपुरावा केला होता.
2018 मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही इमारत धूळखात होती. आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयातही जागा मिळते का, याची चाचपणी सुरू आहे. खासगी रुग्णालये उपलब्ध करावीत, आशा सूचनाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. शिवाय कोणतीही औपचारिकता न बाळगता आता हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोव्हिड रुग्णांसाठी खुले केले जाणार आहे.
रुग्णालयातील सर्व बेड्सला ऑक्सिजन पुरवठा, 60 व्हेंटिलेटर, सोनोग्राफी यंत्रणा बसविण्यात आली आहे. सोमवारी पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ.अनिल मुंडे, डॉ. महादेव बनसोडे यांनी पाहणी केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रखडलेला प्रश्न कोरोनामुळे का होईना मार्गी लागला आहे.