लातूर - अखिल भारतीय सैनिक स्कूल सातारा येथे प्रवेश मिळवण्यासाठी झालेल्या प्रवेश परिक्षेदरम्यान आज पोदार इंग्लिश स्कूल या केंद्रावर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इतर माध्यमातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. या अंदाधुंद कारभारामुळे विद्यार्थी घाबरून गेले होते. तसेच नियमित वेळेत प्रश्नही विद्यार्थ्यांना सोडवता आले नाही.
पालकांचा आक्रमक पवित्रा -
रविवारी देशभरात अखिल भारतीय सैनिक स्कूल सातारा येथे प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली गेली. लातूर येथील पोदार इंग्लिश स्कूलमध्ये ही 300 गुणांची परीक्षा होती. मात्र, प्रश्नपत्रिका वाटप करतानाच मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्याचा घाट परीक्षकांनी केला ,तर हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी माध्यमातून प्रश्नपत्रिका दिल्या. विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार करूनही दाद देण्यात आली नाही. अखेर परीक्षेचे तीन तास उलटल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगितला. यावरून पालकांनी प्रिन्सिपल भारत झा यांच्यासह सर्व शिक्षकांना घेराव घातला. एवढेच नाहीस, तर यावर पर्याय काय, असा सवालही उपस्थित केला. पालकांचा आक्रमक पवित्रा पाहता उपजिल्हाधिकारी यादव यांनी प्रिन्सिपल झा यांच्याशी चर्चा करून पालकांशी संवाद साधला. ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे, त्यांची यादी शाळेसमोर लावली जाणार आहे. शिवाय वरिष्ठांशी बोलून काही पर्याय निघेल का, यासंदर्भात चर्चाही केली जाणार आहे. या शिवाय जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्याकडेही याचा अहवाल देऊन योग्य तो तोडगा काढला जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले आहे.
सैनिक स्कूलमध्ये प्रवेशपूर्वीच भवितव्य अंधारात -
सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी देशभरात ही परीक्षा घेतली जाते. यामधून केवळ 60 मुलांची निवड ही राज्यातून होते, तर 12 वर्षाची अटही यामध्ये घालून देण्यात आली आहे. त्यामुळे आता व्यवस्थापकीय मंडळाने निर्णय नाही घेतला, तर विद्यार्थ्यांचे काय होणार हा प्रश्न कायम आहे.
हेही वाचा - भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान संघटनेत उभी फूट? कार्यवाहक चौगुले निलंबित