लातूर - मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील १५ इमारतींना मनपाकडून टाळे लावण्यात आले. अनेक वेळा नोटीस बाजावून देखील कर न भरल्याने मनपाने ही कारवाई केली आहे. मागील अनेक दिवसांपासून महापालिका आर्थिक अडचणीतून जात आहे. यामुळे ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या पाच दिवसात मालमत्ता कर भरला नाही तर मालमत्तेची विक्री करण्यात येईल. अशी नोटीस देखील मालमत्ताधारकांना देण्यात आली आहे. लातूर शहरातील १५ मालमत्ता धारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाई दरम्यान अंबाजोगाई रोडवरील पडिले कॉम्पलेक्स येथील १७ दुकानांना देखील टाळे लावण्यात आले. यात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि राजश्री शाहू बँकेचा समावेश आहे. तसेच एक दवाखाना आणि काही हॉटेलांना देखील टाळे लावण्यात आले आहेत. यातील भाडेकरूंना कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली. यामुळे या ठिकाणाच्या व्यवहारावर त्याचा मोठा परिणाम झाला. बँक सुरु असताना अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही काळ ग्राहकांची गैरसोय झाली. मात्र, मनपाच्या अधिकाऱ्यांनी माघार घेतली नाही. या प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास त्यावर तत्काळ पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उप आयुक्त शैला डाके यांनी कारवाई दरम्यान दिली.
ही वसुली अतिशय मनमानी प्रकारे सुरु आहे. आम्ही दरवर्षी एक लाख वीस हजार मालमत्ता कर भरतो, मात्र मनपाने अचानक साडे सात लाखाची रक्कम भरायला सांगितले, यामुळे हा कर कसा लावण्यात आला या बाबतीत आम्ही पत्रव्यवहार केला. मात्र, मनपाने त्यावर कोणतेही उत्तर न देता थेट कारवाईच केली, असे संतप्त मत बालाजी पडिले यांनी यावेळी व्यक्त केले. तर वरिष्ठांकडून कारवाईचे आदेश आहेत. शिवाय वेळोवेळी नोटीस बजावूनही कर न भरल्याने ही कारवाई अनिवार्य असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.