लातूर - सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी दारू निर्मिती आणि अवैध वाहतुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील रेणापूर लातूर व उदगीर तालुक्यात ६ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत १७ गुन्हे दाखल केले असून ६ आरोपी अटक करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत रेणापूर तालुक्यातील वसंतनगर तांडा, लातूर तालुक्यातील काटगाव तांडा व कानडी बोरगाव तांडा तर, उदगीर तालुक्यातील कवळखेडा तांडा येथे कारवाई केली. यात एकूण ८ हजार ४०० लिटर रसायन नष्ट केले. यात हातभट्टी दारु, देशी दारु, विदेशी दारू जप्त करण्यात आली. तर, मद्य निर्मितीची रसायने नष्ट करण्यात आली आहेत. निवडणुकांच्या काळात राज्य उत्पादन विभागाच्या वतीने कारवाईची मोहीम सुरू आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू अड्डे उधवस्त करून संबंधितांना ताब्यात घेण्यात आले.