लातूर - दीड महिन्यांपूर्वी बहरात असलेले खरीप सध्या काढणीच्या वेळी पाण्यात आहे. निसर्गाचा लहरीपणा काय असतो, याची अनुभूती खरिपात शेतकरी अनुभवत आहेत. शेतामध्ये पाणी असताना उरले-सुरले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
जिल्ह्यातील 6 लाख 14 हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यामध्ये 4 लाख 59 हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरणी झाला आहे. सोयाबीनसाठी मुख्य बाजारपेठ ही लातूरमध्येच उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा या पिकावरच भर असतो.
हेही वाचा-ठरलं! टेस्लाची कार पुढील वर्षी भारताच्या बाजारपेठेत होणार दाखल
पेरणीपूर्व समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा पिकासाठी करण्यात येणारी सर्व कामे वेळेत झाली होते. मात्र, महाबीजच्या बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. तेव्हापासूनच खरीपाला लागलेले ग्रहण अद्यापही कायम आहे. पेरणी, मशागत आणि खतावर हजारोंचा खर्च करून काढणीला 15 दिवसाचाच अवधी असताना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सर्व पिके ही पाण्यात गेली आहेत. यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 74 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा-दिलासादायक! सप्टेंबरमध्ये निर्यातीत ५.२७ टक्क्यांची वाढ
गेल्या 7 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पीक काढणीची लगबग सुरू झाली आहे. पण मजुरीचे दर दुपटीने वाढले आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीसाठी एकरी 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत. पीक पाण्यात असतानाही उत्पादनाच्या दृष्टीने शेतकरी धडपड करत आहेत. उत्पादनात तर घट झालीच आहे. तसेच पिकाचे पंचनामे करण्यासही दिरंगाई होत आहे.