लातूर - सध्या बाजारपेठेत केवळ कांदा आणि सोयाबीनच्या दर वाढीची चर्चा आहे. मात्र, दरवर्षी वाढणाऱ्या डाळींचा दर मात्र यंदा स्थिरावल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तूर, उडीद, मूग या डाळीचे भाव स्थिर असून आठ दहा दिवसांनी आवक सुरू झाल्यास दरांमध्ये अजून घट होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - हैदराबाद, उन्नावनंतर आता रायपूर हादरलं, दिवसाढवळ्या चाकू हल्ल्यात २ तरुणींचा मृत्यू
अवकाळी पावसामुळे सोयाबीन आणि कांद्याचे दर वाढले आहेत. सोयाबीन अंतिम टप्प्यात असताना यावेळी पावसाने हजेरी लावली आणि सोयाबीन पीक शेतातच राहिले, तर काढणी झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे पाण्याअभावी उन्हाळी कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. विदर्भात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र, या ठिकाणीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे आवक कमी झाली आणि कांद्याचे दर दीड हजार क्विंटलवर गेले. सोयाबीनलाही चार हजार दोनशेचा दर मिळू लागला आहे. असे असले तरी डाळीचे दर मात्र स्थिर आहेत.
हेही वाचा - लिफ्ट दिलेल्या तरुणीसोबतच अश्लील चाळे.. नंतर तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून केली हत्या
चना डाळ ५५ ते ६० रुपये किलो तर मसूर डाळ ६० रूपये, तूर डाळ ८० ते ८५ रूपये, मुगडाळ ९० रूपये आणि उडीद डाळ १०० ते १०५ रूपये, अशी सध्याचे डाळीचे दर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून या दरांमध्ये चढउतार झालेले नाहीत. शिवाय आगामी काळात आवक मोठ्या प्रमाणात झाल्यास दर घटतील, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हमी भावाने डाळ खरेदीसाठी प्रशासनाने केंद्र उभारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.