लातूर - करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून एक ना अनेक उपाय काढले जात आहेत. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत गर्दी करत आहेत. असाच प्रकार लातूरातील भाजी मंडई परीसरात समोर आला आहे. शहरातील भाजी मंडईची ठिकाणे बंद करण्यात आली असून हातगाड्यावर भाजी विकण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दारात भाजी येत असतानाही ज्याठिकाणी भाजीपाल्याचे सौदे होतात त्याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा... राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९०; आतापर्यंत ५० जणांना डिस्चार्ज
सध्याच्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये किराणा दुकान असेल की भाजी मंडई. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत भाजी घेण्यासाठी लातूरकर गर्दी करत आहेत. शहरातील गंजगालाई, पाण्याची टाकी ही भाजी विक्रीचे ठिकाणे होती. गर्दी टाळण्यासाठी दोन वेळा ही भाजी विक्रेची ठिकाणे स्थलांतरीत करण्यात आली होती.
गर्दी कायम होत असल्याने दयानंद महाविद्यालय, ईदगा मैदन ही ठिाकाणेही बंद करण्यात आली. आता हातगाड्यावर गल्ली-बोळात जाऊन भाजी विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी सौदे होतात तिथे भाजी कमी दरात मिळते म्हणून ग्राहक आता थेट सौद्याच्या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासनाने अद्दल घडवली आहे. आता अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.