लातूर- महाशिवरात्री निमित्त लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. वीरशैव गवळी समाजाच्या वतीने सिद्धेश्वराला दुग्धाभिषेक घालून यात्रेची सुरुवात झाली आहे. आज महाशिवरात्री आणि यात्रेचा पहिला दिवस असल्याने दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा-Women t20 WC : भारताने ऑस्ट्रेलियाला लोळवले, १७ धावांनी साकारला विजय
गेल्या 66 वर्षांपासून येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात हा यात्रा मोहोत्सव पार पडत आहे. त्याअनुषंगाने मंदिराची सजावट करण्यात आली असून कळसावर विद्युत रोषणाई केली आहे. सकाळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर झेंड्याच्या काट्यांची मिरवणूक काढण्यात आली.
8 मार्च पर्यंत याठिकाणी विविध धार्मिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. अनेक पुराणग्रंथ आणि वैदीक ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. हेमाडपंथी वास्तुशिल्पीचा अजोड नमुना असलेले हे मंदिर आहे. विश्वस्त मंडळाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून यात्रा दरम्यान पोलीस बंदोबस्तही तैनात राहणार आहे. आगामी १५ दिवसांमध्ये पशू प्रदर्शन, महिला विषयक विविध कार्यक्रम, आतिषबाजी, कुस्त्या अशा कार्यक्रमाची मेजवाणी असणार आहे. काल्याचे कीर्तनाने यात्रेची सांगता होणार आहे.