निलंगा (लातूर) - राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजी पाटील निलंगेकर यांना आज सकाळी एका खासगी रुग्णालयातून पुणे येथे हलविण्यात आले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आमदार निलंगेकर यांनी सोशल मीडियात दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांच्यावर उपचार चालू असताना त्यांच्या घशाच्या स्त्रावाची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या तब्येतीची माहिती नातू आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी समाज माध्यमातून दिली आहे. शिवाजी निलंगेकर यांचे वय ९१ वर्षे आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आमदार निलंगेकर यांनी लातूर येथील काही डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर शिवाजी निलंगेकर यांना आज पुण्यात हलविण्यात आले आहे.
शिवाजी निलंगेकर यांना महामार्गाने पुण्याला नेल्याची माहिती मिळत आहे. डॉ. निलंगेकर यांची मराठवाड्यातील निष्ठावंत काँग्रेस नेते म्हणून संपूर्ण राज्यात ओळख आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे अत्यंत निकटचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.