लातूर : राज्यात आज दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. यात कुणी शंभर टक्के मिळाले म्हणून आनंदात आहे तर कोणी कमी गुण मिळाले म्हणून दुःखी आहे. पण ऐन इंग्रजी पेपरच्या दिवशीच वडिलांचे निधन झाले असतानाही शीतल रोंगे हिने या विषयात 70 गुण पटकाविले आहेत. टक्केवारी कमी असली तरी वडिलांचा मृतदेह दारात अन् शीतल परीक्षा कक्षात गेली होती. इंग्रजीसारखा अवघड विषयातही तिने 70 गुण मिळविले आहेत. पेपर संपल्यानंतर तिने वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
शीतल तुकाराम रोंगे ही मूळची बोरगाव नकुलेश्वर येथील असून गावलागतच्या आंधोरा गावात ती इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. एकुर्गा येथील परीक्षा केंद्रावर ती परीक्षा देत होती. ऐन इंग्रजी विषयाचा पेपर असतानाच तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी 6 वाजता मृत्यू झाला. वडिलांचा मृतदेह दारात असताना परीक्षेला जावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत शीतल होती. मात्र, एक पेपर दिला नाही तर वर्ष वाया जाईल या धास्तीने प्रतिकूल परस्थितीमध्येही ती परीक्षेला गेली आणि पेपर सोडवला.
इंग्रजीसारखा आवघड पेपर आणि मनातील चलबिचलता यामुळे निकाल काय लागेल याकडेच सर्वांचे लक्ष होते. मात्र, शीतलला 53 टक्के मार्क मिळाले असले तरी तिने सर्वाधिक 70 मार्क हे इंग्रजी विषयात घेतले आहेत. घरची परिस्थिती हलाकीची असताना शीतलच्या आईने मोलमजुरी करून तीन बहिणींची लग्न केली आहेत. तर, आता शीतलच्या पुढील शिक्षणाकरता तिला मदतीची गरज आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आता तिला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागेल. मात्र, घरात आठरा विश्व दारिद्र्य असताना कुणी मदत केली तर शितलला शिक्षण देणे शक्य असल्याचे तिच्या आईने सांगितले आहे.
शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांची साथ असल्यामुळेचे दहावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य झाले, असे ती सांगते. परंतु, आता घरची जबाबदारी माझ्यावर आणि आईवरच असल्याने कठीण काळ आहे, असे ती म्हणाली. पण आई- वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण घेणारच असल्याचा निर्धार शीतलने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला. गरीब परिस्थिती आणि ऑनलाईन निकाल बघण्याची सोय नसल्याने किती गुण मिळाले आहेत हे देखील शितलला दुपारी 3 वाजेपर्यंत माहिती नव्हते. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये शीतलसारख्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे असेल तर, समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येणे गरजेचे आहे.