लातुर - दुष्काळी उपयोजनांबाबत आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही आचारसंहितेचे कारण पुढे करून पाणी पुरवठ्याचा विषय टाळणाऱ्या सरपंचास ग्रामस्थांनी मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना निलंगा तालुक्यातील हालसी गावात घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर येत आहे.
पाणीसाठा असतानाही नियोजनाअभावी ग्रामस्थांची भटकंती कायम होती. त्यामुळे ग्रामस्थ आणि येथील सरपंच राजू गंगथडे यांच्यात सातत्याने बाचाबाची होत होती. पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने रघुनाथ कांबळे यांची विंधन विहीर अधिग्रहण केली होती. मात्र, या विहिरींची खोली २०० फुटापेक्षा जास्त नसावी, असा निकष लावण्यात आला आहे. या परिसरात ६०० ते ६०० फुटापर्यंत पाणीच नसल्याने २०० फुटपर्यंतच्या बोअरचा काही लाभ होणार नव्हता. त्यामुळे उर्वरित खर्च लोकवर्गणीतून केला जाणार होता. यासंबंधी ग्रामस्थांनी ठरावही मंजूर करून येथील नागरिक विठ्ठल सावरे यांच्याकडे लोकवर्गणी जमा करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार ३० हजार रुपयांचा निधीही जमा झाला.
तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने गावकऱ्यांनी बोअर घेण्याचा तगादा सरपंच गंगथडे यांच्याकडे लावला. मात्र, आचारसंहितेमुळे बोअर घेता येणार नसल्याचे कारण सरपंच यांनी पुढे केले. यामुळे नागरिक, लोकवर्गणी जमा केलेल्या विठ्ठल सावरे व सरपंच यांच्यात बाचाबाची झाली. यातूनच सरपंचांना मारहाण झाली होती. यासंबंधी सरपंच राजू गंगथडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल रामशेट्टी हे तपास करीत आहेत. दुष्काळी उपपयजोजनांबाबत आचारसंहिता शिथिल करूनही तीच सबब पुढे केली जात असल्याने, संतप्त होऊन ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले आहे.