लातूर - भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांना टोला लगावला आहे. आम्ही देशमुखांना भाजपमध्ये घेत नाही, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर आहेत, मात्र स्थानिक भाजपनेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा प्रवेश रखडल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
लातूरचे प्रिन्स भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसापासून लातूर शहराचे काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धिरज देशमुख हे भाजपत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. यावर भाजपच्या किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने उघडपणे यावर भाष्य केले नव्हते. सर्वांनीच यावर सावध भूमिका घेतल्याचे दिसत होते. पण लातुरात झालेल्या भाजपच्या युवा मेळाव्यात माजी मंत्री तथा भाजपनेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जाहीर व्यासपीठावरुन स्पष्ट भूमिका मांडली. लातूरचे प्रिन्स असलेले आमदार अमित देशमुख हे भाजपत येतो अशी हवा करत आहेत. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा लोभ आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपत घेणार नाही आणि ते काही भाजपत येणार नाहीत. कारण त्यांचे भाजपत येणे माझ्या युवा कार्यकर्त्यांना बिलकूल आवडणार नाही, असे वक्तव्य भाजपनेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
रितेश देशमुखच्या कंपनीला चुकीच्या पद्धतीने कर्ज काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांचे लहान बंधू लातूर ग्रामीण मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख हे लातूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहेत. आमदार धीरज देशमुख यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांचे बंधू अभिनेता रितेश देशमुख व पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो कंपनीला चुकीच्या पद्धतीने नियम डावलून कर्ज वाटप केल्याचे भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला होता. त्याची दखल घेत राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सदरील प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आमदार अमित देशमुख किंवा आमदार धीरज देशमुख हे भाजपत प्रवेश करणार असे लातूरच्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपनेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातुरातील भाजपच्या युवा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून राजकीय चर्चांना उधाण आल्याचे चित्र आहे.