लातूर - स्वच्छ आणि सुंदर शहर असलेल्या लातूरच्या अंतर्गत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत गिरवलकर नगर परिसरातील नागरिकांच्या समस्या 'ईटीव्ही भारत'ने मांडताच दुसऱ्याच दिवशी रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांकडून सर्व प्रकारचा कर भरून घेतला जातो. मात्र, सुविधा मिळत नव्हती. पावसाळा सुरू झाला की वाहने तर सोडाच पायी मार्गस्थही होणे अवघड झाले होते. याकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचेही लक्ष नव्हते. यातच दोन दिवसांपूर्वी खराब रस्त्यामुळे एका वाहनधारकाचा अपघात झाला होता. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले होते.
हेही वाचा - लातूर शहरात रस्त्यांची दुरवस्था, महापालिकेचा दावा फोल
रस्ता दुरुस्तीसाठी मनपा प्रशासन तसेच पालकमंत्री अमित देशमुख यांनाही निवेदन देण्यात आले होते. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते. यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला होता. यानंतर 'ईटीव्ही भारत'ने घेतलेल्या भूमिकेमुळे या भागात मुरूम टाकण्याचे काम हाती घेतले आहे. नागरिकांच्या मागणीप्रमाणे हा रस्ता पूर्ण केला जाणार असल्याचे नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर यांनी सांगितले आहे.
शिवाय या प्रभागातील नगरसेवक दिपताई गित्ते, देवभाऊ सोळुंके, शोभाताई गोमटाळे यांनीही प्रयत्न केले आहेत. शिवाय पावसाळ्याच्या तोंडावर हे काम होत असल्याने या भागातील नागरिकांचा तात्पुरता का होईना प्रश्न मार्गी लागला आहे. भविष्यात पक्का रस्ता करून दिला जाईल, असेही आश्वासन नगरसेवकांनी दिले आहे.