निलंगा (लातूर) - शहरातील बँक कॉलनी परिसरात पालावर राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेत असल्याच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात रिक्षाचालकाचा डाव फसला. माजी पंचायत समिती सदस्याच्या समयसूचकतेमुळे मुलींना वाचवून त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले. रिक्षावाला या मुलींचे अपहरण करून हैदराबादकडे घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पालकवर्गात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
हेही वाचा - सातारा: उडतारे गाव हद्दीतील सेवा रस्ता ८ फुटाने खचला
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा शहरातील बँक कॉलनी रस्त्यावर भाजी बाजाराच्या बाजूला तन्मोर शिंदे यांची पाल (झोपडी) असून तन्मोर हा पारधी समाजाचा असल्याने तो शिकारीसाठी दिवसभर रानावनात भटकत असतो. तर, त्याची पत्नी भंगार गोळा करण्यासाठी गावोगाव फिरत असते. त्यांना नऊ अपत्ये आहेत. यातील मधु तन्मोर शिंदे (वय ७) व प्यारी तन्मोर शिंदे (वय ५) या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर खेळत होत्या. या वेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना बोलावून फिरण्याचे आणि खाऊचे आमिष दाखवून रिक्षात बसवले. ही रिक्षा उदगीर वळणापर्यंत आल्यानंतर हैदराबादच्या दिशेने धावू लागली. निर्मनुष्य रस्ता व अंधार पाहून मधु व प्यारी गोंधळून गेल्या आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करत रडू लागल्या. याच वेळी माजी पंचायत समिती सदस्य मुरलीधर अंचूळे निलंग्याकडून आपले गाव सावरीकडे निघाले होते. त्यांना लहान मुले रडत असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी रिक्षाला थांबवले. त्या क्षणी या दोन्ही मुली रिक्षामधून उडी मारून मुरलीधर अंचूळे यांना बिलगल्या. रिक्षावाल्याची चौकशी करताच घाबरलेल्या चालकाने पुन्हा निलंग्याकडे धूम ठोकली आणि तो पसार झाला. अंचूळे यांनी या दोन्ही मुलींना पोलीस ठाणे निलंगा येथे रवाना केले.
या घटनेनंतर, निलंगा पोलिसांनी तत्काळ पेट्रोलिंग वाढवून संशयित आरोपीचा शोध चालू केला. या मुलींची आई बालाबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर करत आहेत. या घटनेमुळे पालकवर्गात मोठी घबराट निर्माण झाली आहे. निलंगा पोलिसांनी तत्काळ पेट्रोलिंग वाढवून ऑटो रिक्षा व चालकाचा शोध सुरू केला आहे. रिक्षावाला या मुलींचे अपहरण करून हैदराबादकडे घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या मुलींना हैदराबाद येथे विकण्याचा मानस असावा, असाही कयास काही पालकांनी बोलून दाखवला.
हेही वाचा - शेतकरी म्हणतात... असली तुटपुंजी नुकसान भरपाई न दिलेली बरी