लातूर - जळकोट तालुक्यातील शेलदरा येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये 'रसल कुकरी' हा दुर्मीळ साप आढळला. सर्पमित्राच्या मदतीने सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अशा प्रकारचा साप प्रथमच आढळल्याने शेलदरा परिसरात तो कुतुहलाचा विषय झाला.
शेलदरा येथील शेतकरी नागनाथ शिवाजी गुट्टे हे सायंकाळी जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेले होते. तेव्हा त्यांना हा साप दिसला. त्यांनी विलंब न करता गावातील सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांना संपर्क केला. सर्पमित्र काळे यांनी जाऊन सापाला पकडले.
कसा आहे 'रसल कुकरी' -
रसेल कुकरी साप दुर्मीळ असून शेलदरा परिसरामध्ये प्रथमच आढळला आहे. हा साप बिनविषारी गटातील असून याची सरासरी लांबी १.६ इंच आहे. या सापाच्या मानेवर उलटी 'व्ही' अक्षराची खुण असते. या सापाचे पोट पांढरट किंवा फिकट पिवळसर असते. त्याचे शरीर सडपातळ व शेपुट आखुड असते. साधारण एप्रिल महिन्यादरम्यान या सापांचा प्रजनन काळ असतो. एक मादी ५ ते ९ अंडी घालते. लहान-लहान सरपटणारे प्राणी, किटक व त्यांची अंडी या सापाचे खाद्य असते. हा साप अंत्यंत शांत स्वभावाचा समजला जातो. मात्र, जर कधी हल्ला करायचा असेल तर, तो शरीर फुगवून हल्ला करतो, अशी माहिती सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी दिली.
गावात सपाचीचं चर्चा -
शेतामध्ये काम करत असताना सापांचा होणारा वावर हे शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. मात्र, शुक्रवारी सायंकाळी आढळलेला 'रसल कुकरी' या सापाची चर्चा गावभर झाली. हा साप पाहण्यासाठी गावकऱयांनी गर्दी केली होती.सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी गावकऱयांना या सापाची वैशिष्ट्ये सांगितली. घटनास्थळी सर्पमित्र दाखल होण्यापूर्वी मात्र सर्वांची तारांबळ उडाली होती.