लातूर - निलंगा तालुक्यातील कासार शिरशीच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली. हा अधिकारी सरकारी नोकरीसोबत खासगी प्रॅक्टिसही करत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कातील 193 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
निलंगा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या चार दिवसात निलंग्यात कोरोनाचे २७ रूग्ण आढळले आहेत. यातच कासार शिरशी येथील सरकारी दवाखान्यात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉक्टरचे कार्यक्षेत्र असणाऱया उस्तुरी व कासार येथील 193 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कातील दोन व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या किती लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निलंगा शहरामध्ये रामकृष्णनगर, कुडुंबलेनगर, शिवाजीनगर, दत्तनगर, इंद्रा चौक, पीरपाशा दर्गा या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे.