लातूर - शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूर शहरात दोनशेपेक्षा अधिक खासगी कोचिंग क्लास आहेत. यामाध्यमातून येथील क्लास चालकांची उलाढाल ही कोट्यवधींच्या घरात असतानाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. सुरतमधील आगीत वीस विद्यार्थ्यांचा बळी गेला आणि लातुरातील यंत्रणा जागी झाली. दोनशे क्लासपैकी केवळ तीन क्लासमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा असल्याचे समोर आले आहे.
मनपा आयुक्त एम. डी. सिंघ यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन त्वरित उपपयोजना राबवावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने प्रतिष्ठान बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यात 'लातूर पॅटर्न'मुळे शहराचा नावलौकिक आहे. त्यामुळे वर्षाकाठी शहरात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २० हजाहून अधिक आहे. शहरातील महाविद्यालय, वसतिगृह, अभ्यासिका आणि कोचिंग क्लास कायमच विद्यार्थ्यांनी फुलून गेलेली असतात. मात्र, काळाच्या ओघात क्लासचे बाजारीकरण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष होत आहे. गेल्या चार दिवसांपासून मनपाकडून क्लासची पाहणी केली जात आहे. आतापर्यंत १२५ क्लासची पाहणी झाली असून ३ क्लासमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा असल्याचे आढळून आले आहे.
यासंबंधीचा अहवाल सोमवारी मनपा आयुक्त एम. डी. सिंह यांना सादर केला जाणार आहे. त्यानुसार क्लास चालकांना मुदत दिली जाणार असून वेळेत सुरक्षेची अंमलबाजवणी न केल्यास कारवाई केली जाणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, हॉलची साईज व त्यानुसार उपाययोजना काय करावयाच्या याच्या सूचना दिल्या जात आहेत. दोनशेहून अधिक क्लासमध्ये या उपाययोजना राबविल्या जातात का ? प्रशासकीय बडगा किती दिवस चालतो, उपाययोजना पूर्ण होतात का, अशी अनेक प्रश्न मात्र अद्याप तरी अनुत्तरित आहेत.