लातूर - भाजपकडून सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने महाजनादेश यात्रा काढली जात आहे. मात्र, यामध्ये जनतेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. लातूर शहरातील आंबेडकर पार्क येथे सायंकाळी ७ वाजता सभा होत असून या सभेसाठी जनरेटर वापरले जाणार असल्याचे सांगितले जात असले तरी सकाळपासून सुरू असलेली तयारी ही आकड्यावरच असल्याचे 'ईटीव्ही भारत'च्या कॅमेरात कैद झाले आहे.
हेही वाचा - मराठवाड्यावर झालेला अन्याय दूर करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि संबंध प्रशासन यंत्रणा तयारीत व्यस्त आहेत. शनिवारी ३ मतदार संघात आणि रविवारी २ मतदारसंघात मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून सभा होणार आहेत. शुक्रवारी रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने सभास्थळी पाणी साचले आहे. तर याच साचलेल्या पाण्यातून आकडा टाकून सर्व तयारी सुरू आहे. मात्र, हे तात्पुरत्या स्वरुपाचे होते. सभेसाठी जनरेटर वापरले जाणार असल्याचे येथे लाईट फिंटिंग करणाऱ्या कामगारांनी सांगितले. मात्र, कॅमेरासमोर येताच त्यांनी उत्तरे देणे टाळले.
हेही वाचा - विरोधकांचा सत्तेचा माज जनतेने उतरवला - देवेंद्र फडणवीस
महाजनादेश यात्रेनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. आंबेडकर पार्क येथे विद्युत रोषणाई केली जात असून शहरातील रस्तेही चकाचक करण्याचे काम गेल्या २ दिवसांपासून सुरू आहे. शिवाय आज दुपारनंतर शहरातील मार्गावरील वाहतूक इतरत्र ठिकाणाहून केली जाणार आहे. सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षतेसाठी असले तरी सामान्य जनतेचे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.