लातूर - शहरात काही दिवसांपूर्वी मुरुड येथील भारत महाजन यांची हत्या झाली होती. भारत महाजन हे लातुरात उपचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा खून करण्यात आला होता. महाजन यांनी लुटमारीला विरोध केल्याने त्यांचा खून करण्यात आल्याचे आता तपासात समोर आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून एकजण अद्यापही फरार आहे.
हेही वाचा... नागरिकत्व सुधारणा कायद्याचा भारतीय मुस्लिमांशी संबंध नाही - शाही इमाम बुखारी
मुरुड येथील भारत सुधीर महाजन हे २३ सप्टेंबरला उपचारासाठी लातुरात दाखल झाले होते. त्यानंतर दोन दिवस ते गायब असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नमूद केली होती. त्या घटनेच्या दोन दिवसांनी शहरातील गोरक्षण परिसरात पोलिसांना अनोळखी मृतदेह आढळून आले होते. चौकशीअंती ते भारत महाजनच असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर खबऱ्यामार्फत हा खून उदगीर येथील जावेद महेबूबसाब शेख यांनी केल्याचे समजले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ व इतर कर्मचाऱ्यांनी थेट उदगीर गाठून घटनेमागचे सत्य उलगडण्यास सुरुवात केली.
हेही वाचा... पनामा : तुरुंगात गोळीबार, 12 कैद्यांचा मृत्यू
तपासादरम्यान संशयीत आरोपी जावेद मेहबूबसाब शेख याने या घटनेशी संबंध नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखविताच सुधीर महाजन यांची लूटमार करत असताना त्यांनी विरोध केला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे जावेद यानी कबूल केले. शिवाय त्यावेळी हैदराबाद येथील जावेद कुरेशी आणि अन्य एकजण सहभागी होते, असेही त्याने सांगितले.
हेही वाचा... मी पवारसाहेबांचे ऐकले, कारण....
पोलिसांकडून जावेद मेहबूबसाब शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून महाजन यांची अंगठी व इतर चीजवस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. हैदराबाद येथील त्याचा इतर साथीदार जावेद जाफर कुरेशी यांच्याकडून मोबाईल, आधार कार्ड ताब्यात घेण्यात आले आहे. या लुटमारप्रकरणी जावेद कुरेशी याच्यावर हैदराबादमध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत. लूटमार करत असताना भारत महाजन यांनी विरोध केला आणि त्यातून ही दुर्घटना घडली असल्याचे आता अखेर स्पष्ट झाले आहे.