लातूर - औसा येथे ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू करण्याच्या परवान्यासाठी लाच स्विकारणारा पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या नावे ५ हजार आणि स्वतःसाठी ३ हजार, अशी लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. राजेंद्र कांबळे, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - एक हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात
शहरात ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरु करण्यासाठी मागणी करेल तेवढी रक्कम अदा करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती कांबळे याने तक्रारदाराला घातली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत विभागात तक्रार नोंदवली. त्यानंतर कांबळे याला लाच घेताना पकडण्यात आले. तापासाअंती राजेंद्र कांबळे याने तक्रारदाराकडे 8 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. राजेंद्र कांबळे ज्या ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्यावर आहे त्याच ठाण्यात त्याच्यावर कारवाई सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांनी ही कारवाई पार पाडली.