लातूर - शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असून, निलंगा येथे विक्रमी हरित शिवप्रतिमा साकारली जात आहे. यासाठी आळीव गवताच्या बियाणाचे ६ दिवसांपूर्वी रोपन करण्यात आले होते. याच्या साह्याने सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल ६ एकारात प्रतिमा साकारली जात आहे.
शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न निलंगा नगरपरिषद व आक्का फाऊंडेशन च्यावतीने करण्यात आला आहे. शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणूकीला फाटा देत, यंदा निलंग्यामध्ये अनोख्या प्रकारे हा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून याची तयारी सुरू असून, शिवजयंती दिवशी शिवप्रेमींना एक अनोखा देखावा पाहवयास मिळणार आहे.
यासाठी ६ दिवसांपूर्वीच शहरालगतच्या दापका रोड लगतच्या ६ एकरातील शेत जमिनीवर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेप्रमाणे आळीव गवत बियाचे रोपन करण्यात आले आहे. याला ठिबकद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या ५ दिवसाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा गवाताच्या रुपाने समोर येत आहे. २० फेब्रुवारी रोजी ही शिवप्रतिमा सर्व शिवभक्तांना पाहवयास मिळणार आहे. गतवर्षी लातूर शहरात सर्वात सर्वात मोठी रांगोळी काढण्यात आली होती. याच वेगळेपणाची परंपरा कायम ठेवत यंदा हा उपक्रम सादर करण्यात आला आहे.
शिवप्रतिमा पाहायला येणाऱ्या शिवप्रेमींना वृक्ष लागवड आणि पाणी संवर्धनासाठी सीड पेपर देण्यात येणार आहे. यामध्ये तुळशी व वडाचे बियाणे असणार आहे. या सीड पेपरवरील सामाजिक संदेश वाचून या पेपरचे रोपन केल्यास या मधून रोपटे उगवणार आहे. त्यामुळे अनोख्या पद्धतीने साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सवास जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ. लालासाहेब देशमुख, अरविंद पाटील तसेच शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.