लातूर - मोदी सरकार सर्व घटकांसाठी समर्पक आहे. मागील ५ वर्षांत महागाई आणि आतंकवादावर अंकुश लादण्यात मोदी सरकारला यश आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लातूरकर मोदी सरकार निर्माण करण्यात हातभार लावतील, असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे.
गोयल म्हणाले, जिल्ह्याने ४ मुख्यमंत्री आणि २ गृहमंत्री देऊनही ७० वर्षात एकही मोठा प्रकल्प झाला नाही, हे काँग्रेसचे अपयश आहे. ज्या दिवशी रेल्वे बोगी कारखान्याला मान्यता दिली तो ३१ डिसेंबर २०१८ हा दिवस कधीही विसरणार नाही. १६० वर्षांच्या इतिहासात हा, असा प्रकल्प आहे की, ज्याला २ महिन्यांत मान्यता मिळाली होती.
लातूरचा बोगी कारखाना हा ऐतिहासिक प्रकल्प आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे, सध्या कारखान्याचे काम प्रगतीपथावर असल्याचेही गोयल यांनी सांगितले. काम कोणतेही असो, केवळ आरोप करणे हेच काँग्रेसचे काम आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
केंद्र आणि राज्यात एकच सरकार असल्याने सर्व कामांचा वेग दुप्पटीने वाढला आहे. लातूर रोड ते गुलबर्गा या कामाचाही सर्व्हे सुरू असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्तमुळे पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे भविष्यात लातूरला कधी रेल्वेने पाणी आणण्याची गरज लागणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.