लातूर - हरियाणा येथून पासचा आधार घेत १२ जण जिल्ह्यातील निलंगा येथे दाखल झाले होते. त्यापैकी ८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. देशात सर्वत्र लॉकडाऊन असताना या १२ जणांना प्रवासासाठी पास कोणी दिली, याबाबत चौकशी सुरू झाल्यानंतर फिरोजपूर येथील माजी पंचायत समिती सभापती या प्रकरणात दोशी असल्याचे आढळले आहे.
हरियाणातील फिरोजपूर जिरका येथून आंध्रप्रदेश येथील करनूल जिल्ह्यात जाण्यासाठी १२ तबलिगी जमातीच्या यात्रेकरूंनी प्रवाशी पास मिळवला होता. त्यानंतर हे सर्व तबलिगी करनूलकडे रावाना झाले होते. मात्र वाटेत निलंगा येथे पोलिसांनी या १२ जाणांना अडवले. या सर्वांची चौकशी केली असता हे नागरिक करनूल येथे जात असल्याचे पोलिसांना समजले. मात्र, लॉकडाऊन असताना या सर्व नागरिकांना प्रवाशी पास कोणी दिली, या प्रश्नाचे उत्तर अद्याप अनुत्तरित होते.
त्यानंतर कोरोना तपासणीत या १२ जाणांपैकी ८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याप्रकरणाची दखल घेत या १२ जणांना पास कोणी दिली, याचा छडा लावण्यासाठी चौकशी करण्याचे पत्र हरियाणा सरकारला लिहिले होते. त्यानंतर, फिरोजपूर जिरका येथील पंचायत समितीचे माजी सभापती फकरोद्दिन यांनी १२ जणांमधील एकजण आजारी असल्याचे खोटे कारण सांगून फिरोजपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पास मिळविल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून माजी सभापती फकरोद्दिन यांच्यावर फिरोजपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पास मागणाऱ्याकडून धार्मिक ठिकाणचा प्रवेश, विविध ठिकाणचा प्रवासाचा इतिहास लपविण्यात आला होता. माझी फसवणूक करून माझ्याकडून पास घेण्यात आल्याची तक्रार फिरोजपूर झिरका येथील उपविभागीय अधिकारी यांनी केली आहे.
हेही वाचा- ...मिळाले तर शिवभोजन अन्यथा उपासमार ; हातावर पोट असलेल्यांची चित्तरकथा