लातूर - महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी राज्यातील उमेदवारांसाठी 'पवित्र पोर्टल' सुरू केले आहे. त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र, या पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने तब्बल ३५ हजार उमेदवार प्रतिक्षेत आहेत. म्हणून ही प्रणाली ऑनलाईन असल्याने अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे.
शिक्षक भरतीमध्ये अनियमितपणा होऊ नये म्हणून पवित्र पोर्टलद्वारे अर्ज भरण्याची अत्याधुनिक प्रणाली राबवली जात आहे. याकरिता १ लाख २० हजार उमेदवारांना अर्ज भरावयाचे आहेत. यापैकी केवळ ८५ हजार जणांचेच लॉग इन झाले आहे. आज ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असताना ३५ उमेदवार यापासून वंचित राहिले आहेत. मात्र, २५ जूनपासून या पोर्टलवर संकेतस्थळ बंद व लॉगिन आयडी उघडत नसल्याच्या समस्या उद्भवत आहेत.
जिल्हा परिषदेने या समस्येसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. तर या उमेदवारांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद आणि नांदेड येथून आलेल्या शेकडो उमेदवारांची गैरसोय होत आहे. शिवाय तक्रार निवारण्यासाठी देण्यात आलेले संपर्क क्रमांकही प्रतिसाद देत नसल्याने हे उमेदवार त्रस्त आहेत. १ जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. उमेदवारांकडून यामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.