लातूर - तालुक्यातील पाखरसांगवी येथे दोन वर्षांपूर्वी रुजू झालेल्या ग्रामसेवकाची अचानक बदली करण्यात आली होती. यामध्ये वरिष्ठ पातळीवर राजकारण झाले असून पाखरसांगावी येथे अतिरिक्त ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे गावच्या विकासकामांत खीळ बसणार असल्याचे म्हणत ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - हिंदू संस्कृतीची टिंगलटवाळी खपवून घेणार नाही - हिंदू राष्ट्र सेना
आम्हाला सध्याचेच ग्रामसेवक हवेत - ग्रामस्थ
लातूर शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर पाखरसांगावी हे गाव आहे. दोन वर्षांपासून येथील ग्रामसेवकपदी विष्णू भिसे हे होते. तेव्हापासून विकासकामे गतीने होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सर्व काही सुरळीत असताना भिसे यांची बदली करून येथील ग्रामसेवक पदाचा कारभार पेठच्या ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तसेच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नवीन येणाऱ्या ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप
पेठ येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही पाखरसांगावीचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे विकासकामे तर सोडाच, पण सुरू असलेल्या कामाला खीळ बसणार असल्याची भावना ग्रामस्थांची झाली आहे. भ्रष्ट ग्रामसेवक नको तर, विकासकामे करणारा ग्रामसेवक पाहिजे, अशी भावना पाखरसांगावी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषणास सुरवात केली आहे. शुक्रवारी सकाळी 11 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरवात झाली आहे.
गावच्या विकासकामात राजकारण करू नये
सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून गावच्या विकासकामांत भर पडत आहे. पण पेठ येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही त्यांना पाखरसांगावी येथील अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसणार आहे. विष्णू भिसे यांच्याकडील पद कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
हेही वाचा - वाहतुकीच्या बाबतीत पुण्याचे लोक घाबरतात हेच खूप - अभिनेते विजय पाटकर