लातूर - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून समाजातील अनेक घटकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. आरक्षणाबाबत छावा संघटनाची भूमिका काय याबाबत लातूरमध्ये बैठक पार पडली. ओबीसीमध्ये आरक्षणाचा टक्का वाढवून यामधूनच आरक्षण देण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे. शिवाय सुनावणी दरम्यान सरकारने समाजाची बाजू व्यवस्थित मांडली नाही, तर मुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांना चाबकाचा प्रसाद दिला जाईल, असा इशारा छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.
अन्यथा चाबकाचे फटके दिले जाईल -
मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून सरकारनेही योग्य भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आरक्षणाचे काय होईल, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. ओबीसींमध्ये मराठा समाजाचा सहभाग करून घ्यावा, ही जुनीच मागणी आहे. पण ऐन वेळी होत असलेले राजकारण होत असल्याने समाज आरक्षणपासून वंचित राहिलेला आहे. आता 8 ते 18 मार्च दरम्यान कोर्टात आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. यामध्येही सारकरने वेळकाढू पण केला, तर समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने भूमिका मांडणे आवश्यक आहे. पण ओबीसीमध्ये समाजाचा सहभाग नोंदवून आरक्षण मिळवून देणे हे शक्य असताना दुर्लक्ष होत आहे. मात्र, आता आरक्षण मिळाले नाही, तर मंत्रालयात घुसून सर्व मंत्री, मुख्यमंत्री यांना चाबकाचे फटके दिले जाईल, असे छावा संघटनेने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत समाजातील नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी केली होती. मात्र, एवढे होऊनही आरक्षण मिळत नसेल, तर आगामी काळात गनिमी काव्याने लढा उभारला जाणार असेही छावा संघटनेचे कार्यध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान संघटनेत उभी फूट? कार्यवाहक चौगुले निलंबित