लातूर- सकाळच्या प्रहरी बेधुंद वेगाने कार चालविणाऱ्या तरुणाने एका स्कुटीला व मॉर्निंग वॉकिंगसाठी जात असलेल्या डॉक्टरांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये स्कुटीवरील तरुण, तरुणी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. तर 75 वर्षीय डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी सकाळी आदित्य संजय शिंदे (वय 19) हा वडिलांची चारचाकी गाडी घेऊन बाहेर पडला. सुसाट वेगाने कार (एम.एच. 24 ए. बी 0017) मार्गस्थ होत होती. दरम्यान, शहरातील औसा रोडवरील नंदी स्टॉपजवळ स्कुटीवर निघालेल्या संजय ढगे व अंजली बालाजी हारडे यांच्या गाडीला चारचाकीने जोराची धडक दिली. एवढेच नाही तर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या डॉ. तात्याराव गोविंदराव मोहिते यांनाही धडक दिली.
गंभीर जखमी असलेल्या डॉ. मोहिते यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर संजय आणि अंजली देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कारचा वेग एवढा होता की, दुचाकीला धडक देऊन ही कार थेट फुटपाथवर चढली. वडील झोपेतून उठण्याच्या अगोदरच आदित्यने हा पराक्रम केला. आर्धा तास सुरू असलेल्या या प्रकारामुळे औसा रोडवर नागरिकांची गर्दी झाली होती.
धनंजय काशीनाथ सगरे यांच्या फिर्यादीवरुन शहरातील शिवाजी नगर ठाण्यात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासणी सुरू आहे.