लातूर - सर्वत्र गणेश विसर्जनाची लगबग सुरू असली तरी लातुरात प्रशासन वेगळीच तयारी करत आहे. विसर्जनाच्या ठिकाणी तंबू लावण्यात आले असून गणेश मूर्तींचे विसर्जन नाही तर संकलन करण्याचे फलक लावण्यात आले आहेत. पाणीटंचाईमुळे ही भीषण स्थिती ओढवली असून शहरातील तीन ठिकाणच्या विसर्जन विहिरींच्या चारही बाजूने मंडप लावण्यात आला असून बाजूलाच मूर्तींचे संकलन केले जाते.
लातुरात गणरायाच्या आगमानापासूनच विसर्जनाची चिंता जिल्हा प्रशासनाला लागली होती. या दरम्यान, पाऊस झाला तरच विसर्जन करता येईल अन्यथा पाणी नसल्याने वेगवेगळ्या पर्याय मंडळासमोर ठेवले जात होते. सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला असून नदी-नाले, विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे विसर्जन करावे कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांची बैठक घेतली होती. यामध्ये मूर्तींचे विसर्जन नाही संकलन करून मूर्ती तयार करणाऱ्यांना दान केली जाणार आहे.
हेही वाचा - ....म्हणून लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची गणेश मंडळांना हात जोडून विनंती
त्यानुसार आज सकाळपासून विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. जिल्ह्यात पाऊसच नसल्याने मूर्ती संकलनाची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवलेली आहे. गणेश मंडळांनीही या आवाहनाला साद घालत मूर्तींचे दान करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी घरगुती मूर्ती या ठिकाणी दाखल होत होत्या. तर दुपारनंतर मंडळातील मुर्तीही येतील, असे सांगण्यात आले आहे.