किल्लारी (लातूर) - सन 1993मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भुकंपाला यंदा 28 वर्ष पूर्ण होत आहेत. या भूकंपातील मौल्यवान, दुर्मीळ वस्तू व अवशेषांचे जतन करण्याकरिता निळकंठेश्वर देवस्थान मंदिर परिसरात 1999मध्ये उभारण्यात आलेल्या 'वस्तु संग्रहालया'ची अवस्था अत्यंत बिकट आहे.
वास्तूची किंमत 58.41 लक्ष रुपये -
महाराष्ट्र शासनाच्या 'आपत्कालीन भूकंप पुनर्वसन प्रकल्प' अंतर्गत किल्लारी येथे 'स्मृती स्तंभ व वस्तू संग्रहालय' या इमारतीचे उद्घाटन 1999मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत दिमाखात करण्यात आले. या प्रकल्पाने एकूण 2.50 एकर क्षेत्र व्यापले आहे. या कामाची एकूण किंमत 58.41 लक्ष रुपये असून वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी शासनाने त्यावेळी 35 लक्ष रुपये खर्च केले आहेत. या प्रकल्पाची सुरुवात फेब्रूवारी 1998मध्ये करण्यात आली होती. मे 1999मध्ये हा प्रकल्प दिमाखात उभा राहिला. उद्घाटनानंतर जवळपास 3-4 वर्ष हे संग्रहालय सुस्थितीत होते. मात्र, त्यानंतर याची पडझड व्हायला सुरुवात झाली. आज 22 वर्षानंतर या संग्रहालयाची अत्यंत वाईट स्थिती असून गुरे बांधण्यासाठी याचा वापर केला जात आहे.
वस्तूसंग्राहलयाची वाईट परिस्थिती -
'वस्तु संग्रहालय' म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण असून शासकीय, सार्वजनिक व ऐतिहासिक माहिती मिळविण्याचे स्त्रोत असते. ज्यामध्ये वस्तुसंशोधक, अभ्यासक यांना अतिशय मौल्यवान, दुर्मिळ वस्तूंचे जतन करुन विनाश, विध्वंस होण्यापासून संरक्षण करता येते. दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी या रोजी भूकंपामध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते. परंतु त्यांच्याच आठवणींचे अवशेष जतन करण्यासाठी उभा करण्यात आलेल्या वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीकडे मात्र प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेंद्र पाटील यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच राज्याचे भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे हे लातूरचे आहेत. शिवाय राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लक्ष देऊन या वास्तूची जपवणूक करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ मोहनसिंग राजपूत यांनी केली आहे.